MK Digital Line
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे. 7 जानेवारी पासून हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने यासंदर्भात माहिती दिली आहे. पुष्पा सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे, तो लढेल..तो धावेल...तो उडी मारेल...पण तो झुकणार नाही. 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'पुष्पा: द राइज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे देखील चाहते कौतुक करत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
Post a Comment