MK Digital Line
कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले आहे. अपेक्षित बोंड आता परिपक्व झाले आहेत. मला आता नवीन पाते, फुले, बोंड यांची अपेक्षा नाही. पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव नगण्य आहे. थोड्या प्रमाणात पांढरी माशी दिसून येत असली तरी त्याची नियंत्रणाची गरज वाटत नाही. गुलाबी बोंडअळीचे पतंग सुद्धा शेतात दिसत नाही. पिकावर दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु त्यामुळे होणारी पानगळ नुकसानदायक ठरणार नाही. कारण माझे पीक १६५ दिवसानंतर काढणीचे नियोजन आहे.

दरवर्षी कपाशीचे फरदड न घेता रब्बी पिके घेण्याचे नियोजन करीत असतो. कपाशीचे पीक १६५ दिवसानंतर काढणी करून रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा किंवा कांदा यासारखे पीक घेता येईल. याचा सर्वात मोठा फायदा जमिनीचा पोत राखण्यासाठी होतो. याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला उत्पन्नात सातत्य राखता येते. 

मागील पंधरवड्यात सततच्या पावसामुळे काही प्रमाणात बोंड काळे पडले होते. त्यामधून निघणारा कापूस कवळीयुक्त, काळपट, ओलसर निघाला. त्याचा वेचणीचा खर्चसुद्धा जास्त आला. निघालेला कापूस दोन दिवस उन्हात वाळू घातला. हा निघालेला कापूस वेगळा ठेवणार आहे. या दर्जाचा कापूस संकलन केंद्रावरून परत आणावा लागला होता. सीसीआयच्या निकषात बसेल अशा दर्जाचा कापूसच संकलन केंद्रावर नेण्याचे माझे नियोजन असते. यामुळे कापूस विक्रीला फारसा त्रास होत नाही. 

आता लवकरच कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणार आहे. त्यामुळे भविष्यात गर्दीचा त्रास होणार नाही. पुढील आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस येण्याची शक्यता आहे. बोंडे उमलली आहेत. मात्र, सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असल्यामुळे मजूर उपलब्ध होणे शक्य नाही. पाऊस कसा व किती दिवस येतो यावरच कापसाची गुणवत्ता ठरणार आहे. पाऊस थांबल्यावरच त्याचे नियोजन ठरवावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post