पतंजलीला 'कोरोनील' ची जाहिरात थांबवण्याचे आदेश
MK Digital Line
कोरोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांच्या 'पतंजली आयुर्वेद'ने मंगळवारी केला. मात्र त्यानंतर पतंजलीला या औषधाची जाहिरात करण्यास आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे मनाई केली आहे.
● प्रतिक्रिया :
पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील आयुष मंत्रालयाने मागितला असून, त्याची पडताळणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. यावर आता पतंजलीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी कम्युनिकेशन गॅप होता, ती आता दूर केल्याची प्रतिक्रिया दिली.
आयुर्वेदाला चालना देणारे हे सरकार आहे. जे काही रँडमाइझ्ड प्लेसबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्सचे मापदंड आहेत, ते 100 टक्के पूर्ण केले आहेत. आम्ही आयुष मंत्रालयाला याची संपूर्ण माहिती दिल्याचे पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.
पतंजलीने या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आल्याचे आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते.
Post a Comment